ॐ जिनाय नम: ॐ सिध्दाय नम: ॐ अर्हत् सिध्दाय नम: भरत ऐरावत क्षेत्रस्थ भूत-भविष्य वर्तमान, तीस चोवीसो भगवान नमो नम:, सीमंधरादि वीस विहरमान तीर्थंकर भगवान नमो नम:, ऋषभादि महावीर पर्यंत १४५२ गणधरदेवेभ्यो नमो नम:, चौसष्ठ ऋध्दिधारी मुनीश्वराय नमो नम:, अंतकृत केवली मुनीश्वराय नमो नम:, प्रत्येक तीर्थंकर वेळी दहा-दहा घोरोपसर्ग विजयी मुनीश्वराय नमो नम:!
अकरा अंग चौदा पूर्व शास्त्र महासमुद्र आहे. त्याचे वर्णन करणारे आज कोणी केवली नाहीत, कोणी श्रुत केवली नाहीत. आमचे सारखे क्षुद्र काय वर्णन करणार? आत्म्याचे कल्याण करणारी जिनवाणी सरस्वती श्रुतदेवी आहे. अनंत समुद्रा इतकी आहे. तर त्या जिनवाणी मध्ये सांगितल्या प्रमाणे जिनधर्म हा कोणी जीव धारण करील त्या जीवाचे कल्याण अवश्य होईल. त्यापैकी एक अक्षर ॐ हे एकच अक्षर जो धारण करतो त्या जीवाचे कल्याण अवश्य होते. या ॐ अर्थात पंच णमोकार मंत्राच्या स्मरणाने सम्मेद शिखरजीवर भांडण करणारे दोन वानर स्वर्गाला गेले. सुदर्शन श्रेष्ठी याचे स्मरणाने मोक्षाला गेला. सप्त-व्यसन धारी अंजन चोर मोक्षाला गेला. हे तर सोडा, एक नीच जातीचा कुत्रा जीवंधर कुमाराच्या उपदेशाने सदगतीला गेला. इतका महिमा जिनधर्माचा आहे. परंतु, कोणी धारण करीत नाही. जैन होवून सुध्दा जैन धर्मावर विश्वास नाही (दीर्घ श्वास सोडुन). अनंत कालापासून जीव व पुद्गल (शरीर), हे दोन्ही भिन्न आहेत, हे सर्व जग जाणते. परंतु विश्वास नाही. पुद्गलालाच जीव व जीवाला पुद्गल मानीत आला आहे. दोन्हीचे गुणधर्म अलग अलग आहेत. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. जीव पुद्गल आहे का? का पुद्गल जीव आहे? पुद्गल तर जड आहे. स्पर्श, रस, गंध, वर्ण हे त्याचे गुण आहेत. ज्ञान-दर्शन रुप चेतना हे जीवाचे लक्षण आहे. आपण तर जीव आहोत. जीवाचे कल्याण करणे, अनंत सुखाला पोहोचविणे आपले काम आहे. परंतु मोहनीय कर्माने जग सगळे भुलुन गेले आहे. दर्शन मोहनीय कर्म सम्यक्त्वाचा घात करते, चारित्र मोहनीय कर्म चारित्राचा घात करते. तर आपण काय केले पाहिजे? सुख प्राप्त करण्याकरिता काय केले पाहिजे? दर्शन मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता सम्यक्त्व धारण केले पाहिजे व चारित्रमोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता संयम धारण केला पाहिजे. हा आमचा उपदेश व आदेश आहे.
अनंत काला पासून हा जीव मिथ्या कर्माच्या योगाने संसारामध्ये फिरत आहे, तर मिथ्या कर्माचा नाश केला पाहिजे. सम्यक्त्व धारण केले पाहिजे. तर सम्यक्त्व काय आहे याचे समग्र वर्णन कुन्दकुन्दाचार्यांनी समयसार, नियमसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, अष्टपाहुड व गोम्मटसार आदि ग्रंथा मध्ये तसे वर्णन केलेले आहे. पण याच्यावर श्रद्धा ठेवतो कोण? तर आपले आत्मकल्याण करुन घेणारा जीव श्रद्धा ठेवतो. सुख कशानं होईल याचा अनुभव घेतो. असेच संसारामध्ये फिरावयाचेच असेल तर अनादिकालापासून फिरत आलाच आहे. उपाय नाही. तर सुख प्राप्त करण्याकरिता आपण काय केले पाहिजे? दर्शन मोहनीय कर्माचा क्षय केला पाहिजे. दर्शन मोहनीय कर्माचा क्षय आत्मचिंतनानेच होतो. दान पूजा केली तर पुण्यबन्ध होतो. तीर्थयात्रा केली तर पुण्यबंध होतो. हर एक धर्माचे काम पुण्य बंधाचे कारण आहे. परंतु केवलज्ञान होण्याला, अनंत कर्माची निर्जरा होण्याला आत्मचिंतन हेच साधन आहे. ते आत्मचिंतन २४ घंटे पैकी ६ घडी उत्कृष्ट, ४ घडी मध्यम, २ घडी जघन्य, निदान १०-१५ मिनीटे, निदान वास्तविक आमचे म्हणणे ५ मिनिटे आत्मचिंतन करावे. आत्मचिंतनाशिवाय वास्तविक सम्यकत्व प्राप्त होत नाही. संसार-बंध तुटत नाहीत. जन्म, जरा मरण सुटत नाही. सम्यक्त्वाशिवाय दर्शन मोहनीय कर्माचा क्षय होत नाही. सम्यक्त्व होऊन ६६ सागरापर्यंत हा जीव संसारात राहील. तर चारित्र मोहनीय कर्माचा क्षय करण्याकरिता संयमच धारण केला पाहिजे. संयमाशिवाय चारित्र मोहनीय कर्माचा क्षय होत नाही. तर कसेही असो हर एक जीवाने संयम धारण केला पाहिजे. म्हणून भिऊ नका! भिऊ नका! संयम धारण करण्यास भिऊ नका! कपड्यात संयम नाही, कपड्यात ७ वे गुणस्थान नाही, ७ वे गुणस्थानाशिवाय आत्मानुभव नाही, आत्मानुभवाशिवाय कर्म निर्जरा नाही. कर्म निर्जरेशिवाय केवलज्ञान नाही. केवलज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून भिऊ नका, भिऊ नका! संयम धारण करण्यास भिऊ नका. ॐ सिद्धाय नमः!
सविकल्पसमाधि, निर्विकल्पसमाधि असे २ भेद आहेत. सविकल्पसमाधि कपड्यामध्ये गृहस्थाला होते. कपड्यामध्ये निर्विकल्पसमाधि नाही. निर्विकल्पसमाधि साधल्याशिवाय वास्तविक सम्यक्त्व नाही. (निश्चय शुद्धात्मानुभवाशिवाय वास्तविक सम्यक्त्व नाही). व्यवहार सम्यक्त्व खरा नाही. हे साधन आहे. फळ येण्यास फूल जसे कारण आहे तसे व्यवहार सम्यक्त्व निश्चय सम्यक्त्वास कारण आहे. असे शास्त्रात सांगितले आहे. निर्विकल्प समाधि मुनिपद धारण केल्यावरच होते. ७ व्या गुणस्थानापासून १२ व्या गुणस्थानात पूर्ण होते. १३ व्या गुणस्थानात केवलज्ञान होते असा नियम आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे. म्हणून भिऊ नका, भिऊ नका! काय तर संयम धारण करा. याच्याशिवाय कल्याण होणार नाही. पुदगल आणि जीव भिन्न भिन्न हे सर्वजण सामान्यपणे समजतात. खरे समजले नाही. खरे समजले असते तर भाऊ, बंधु, माता, पिता आपले म्हणून समजले नसते. हा सगळा पुदगलाचा संबध आहे. जीवाचा कोणी नाही रे बाबा! कोणी नाही. जीव अकेला आहे, अकेला आहे, त्याचा कोणी नाही. एकटाच फिरतो आहे, मोक्षालाही एकटाच जाणार आहे. देवपूजा, गुरुपास्ति, स्वाध्याय, संयम, तप व दान या सहा गृहस्थांच्या क्रिया आहेत. असि, मसि, कृषी, शिल्प, सेवा व वाणिज्य या सहा धंद्यापासून होणाऱ्या पापांचा सहा क्रियांनी क्षय होतो. याच्याने इंद्रियसुख मिळते पण मोक्ष मिळत नाही. पुण्य प्राप्त होते. पंच पापांचा त्याग केल्यापासून पंचेंद्रिय सुख मिळते पण मोक्ष मिळत नाही. संपत्ति, संतति, वैभव, राज्यपद, इंद्रपद पुण्याने मिळते पण मोक्ष फक्त आत्मचिंतनानेच मिळतो. नय, शास्त्र, अनुभव या तिन्हींचा मेळ घालून पहावा मोक्ष कशाने मिळतो. मोक्ष फक्त आत्मचिंतनानेच मिळतो. ही भगवंतांची वाणी आहे. ही एकच सत्य वाणी आहे. या वाणीचा एक शब्द ऐकला अर्थात मनात धारण केला व अनुभव घेतला तर जीव चढून मोक्षाला जातो. तर ही वाणी कोणती आहे तर आत्मचिंतन. बाकी काही केले तर पुण्य बंध पडतो. मोक्ष मिळण्यास आत्मचिंतनच कारण आहे. हे कार्य करायलाच पाहिजे.
सारांश, धर्मस्य मूलं दया, जिनधर्माचे मूळ सत्य – अहिंसा आहे. सत्य – अहिंसा, सत्य – अहिंसा आपण सगळे तोंडाने म्हणतो. स्वयपाक – जेवण, स्वयपाक – जेवण फक्त तोंडाने म्हंटल्याने पोट भरते का? क्रिया केल्याशिवाय, जेवल्याशिवाय पोट भरत नाही. क्रियेमध्ये आणले पाहिजे. बाकी सर्व सोडा, सत्य-अहिंसा पाळा. सत्यामध्ये सम्यक्त्व होते व अहिंसेमध्ये सर्व जीवांचे रक्षण होते. म्हणून हा व्यवहार करा, हा व्यवहार पाळा, त्या मुळे कल्याण होते.