व्रतविधि – आषाढ मासांतील शुक्लपक्षांत प्रथम शुक्रवारी आणि कृष्णपक्षांत अंत्य शुक्रवारी या व्रतिकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन चैत्यालयांस जावें जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ- शुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठांत श्रीजिनेंद्राची प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. मंडपशृंगार करून देवापुढें शुद्ध भूमीवर अष्टदलकमल यंत्र चतुरस्रपंचमंडळे युक्त पंचवर्णानी काढावें. त्यामध्यें एक भाताची राशि पसरून त्यावर स्वस्तिक काढावें. आणि चांगला एक कुंम पाण्यानें भर- लेला सूत गुंडाळून ठेवावा. त्यावर नारळ, पान ठेवून त्यास गंध, हळद, कुंकू लावून फुलांची माळ घालावी. पुढें एका चौरंगावर क्रमानें १०८ स्वस्तिकें काढून त्यांवर पानें गंधाक्षता, फल पुष्पें ठेवावींत. नंतर जिनें- द्राची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. तीन शेर तांदळाच्या पीठाचे पुरण घालून नऊ कानवले करावेत. त्यांतून जिनेंद्रास तीन व पद्मावती देवीस तीन अर्पावेत व तिच्यापुढें भिजवलेले हरभरे पुंज, वाळितोड करमणी ( पादहस्तभूषण-काळेमणी) (तंबीट्टु) राळ्याचे लाडू, तिळाचे लाडू, पानसुपारी यज्ञभाग ठेवावे, ॐ हीं परमब्रम्हणे अनंतानंतज्ञानशक्तये अईत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ सुगंधी पुष्पें घालवींत. श्रीजिनसहस्रनाम स्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. कथा सांगणाऱ्यांस २१ पार्ने व सुपाऱ्या द्याव्यात. घरी येऊन सत्पात्रांस आहारदान देऊन मग आपण ते उरलेलें तीन कानबले खाऊन एकभुक्ति करावी.
याच क्रमानें पुढे प्रत्येक मासीं शुक्रवारी पूजा खंड न पडतां तीन वर्षे व तीन महिने शुक्रवारी पूजा करावी. मध्यंतरी करणे हा उत्तम विधी होय. आणि तिन्ही अष्टान्हिकांत येणाऱ्या शुक्रवारी पूजा करणे हा मन्यमविधि होय. या क्रमानें तीन वर्षे पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळीं महाभिषेक पूजाविधि करून पंचमक्ष्य पायसांचे नव चरु करून अर्पावेत. एक हजार आठ १००८ कमळांनी व पुष्पांनीं अर्चा करावी. अर्थात् कमळे व पुष्पें वहावींत. ३६ छत्तीस तपस्वी तांडांस (मुनिसंघास) निरंतराय आहारदान करून त्यांना शास्त्रादि आवश्यक वस्तूं द्याव्यात. असा या व्रताचा पूर्ण विधी आहे.
प्रमुक्त आणि सकल-विमलकेवलबोधदर्शन सुखवीर्ययुक्त असे वृषभ-
नाथ तीर्थकरांचे दिव्य समवसरण द्वादशगणपरिवेष्टित व शतेंद्रपरिपूजित
होऊन शोभत असतां, त्या सभेत प्रजापति या नांवाचा महाराजा
आपल्या पट्टमहादेवीसह येऊन प्रभूस तीन प्रदक्षिणा व साष्टांग प्रणि-
पात करून मनुष्य कोष्ठांत जाऊन बसला. कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्या
नंतर महाराज आपलीं दोन्हीं करकमळे जोडून अतिविनयानें वृषभ-
सेन गणधरांस म्हणाला, – भो जगद्गुरो गणधर स्वामिन् ! सासष्ट हजार देवीमध्यें मुख्य अशी जी ज्वालामालिनी आहे, तिजला इतकें मोठें ऐश्वर्य कोणत्या पुण्य फळानें प्राप्त झालें आहे ? हे रायाचें विनयपूर्ण वचन ऐकून ते गणेंद्र त्यांस म्हणाले, हे राजन् ! त्या ज्वालामा- लिनी देवी संबंधी आतां तुम्हांस सविस्तर वृत्तांत सांगतो. ऐका.
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रामध्यें आर्य खंड प्रसिद्ध असून त्यांत मगध नांवाचा विशाल देश आहे. त्यामध्यें राजपुर नांवाचें एक सुंदर पट्टण आहे. तेथें पूर्वी जिनदत्त नांवाचा एक राजश्रेष्ठी राहत असे. त्याला अनंतमती नाम्नी प्राणवल्लभा होती. तिला कनकमंजरी
नामें सुंदर, रूपवती कन्या होती. तिला नवयौवन प्राप्त झाले होतें. एके दिवशीं ती चैत्यालयांत जाऊन श्रीजिनेंद्रांस भक्तीनें वंदना करून अशी प्रार्थना करूं लागली कीं; भो श्रीजिनपते ! मला जर लोकोत्तम पुरुष वर होईल, तर आपल्या चरणीं मी सहस्रदलकमल वाहीन. याप्रमाणे प्रतिज्ञा करून ती आपल्या घरी निघून गेली. पुढें कांहीं दिवसांनीं पुंडरीक या नांवच्या एका चक्रवर्तीच्या पुत्रांशीं इचा विवाह झाला. मग ती आपल्या पतिगृहीं जाऊन सुखानें कालक्रमण करूं लागली. असे कित्येक दिवस गेल्यावर एकदां त्या कनकमंजरीस. पुत्रसंतती नसल्यानें ती चिंताक्रांत होऊन रात्रीं निजली असतां, – यक्षी देवी तिच्या स्वप्नांत येऊन तिला म्हणाली, हे कनकमंजरी ! तूं मागें एकदां श्रीजिनेश्वरांच्या चरणीं सहस्रदलकमल वाहणेची प्रतिज्ञा केली आहेस. तिची तुला अगदीच विस्मृती झाली आहे. त्या कारणानें अद्यापि तुला पुत्रसंतती झाली नाहीं. आतां तूं आपली प्रतिज्ञा पूर्ण कर, म्हणजे तुला पुत्रसंतान होईल.’ हे तिचें वचन ऐकत आहे तोच ती एकदम जागी झाली आणि प्रातःक्रिया सर्व करून ती तत्काळ उद्यान वनास गेली. तेथील सरोवरांत ती प्रवेश करून चोहोंकडे पाहूं लागली, इतक्यांत त्या सरोवराच्या मध्यभागी एका नवरत्नमंडपामध्ये बसलेली ऐश्वर्यसंपन्न श्रीदेवी दृष्टीं पडली. तिची ती अपूर्व विभूति पाहून या कनकमंजरीस अत्यंत आश्चर्य वाटलें. तेव्हां ही अगदीं हास्यमुद्रेनें देवीस म्हणाली, हे देवी ! आतां तुम्हाला इतकें ऐश्वर्य व पूज्यता कोणत्या पुण्यफलानें प्राप्त झाली आहे ? हें तिचें वचन ऐकून देवी म्हणते- हे राज्ञी ! मी पूर्वभवांत शुक्रवार व्रत यथाविधि पाळून त्याचें उद्या- पन केलें होते; म्हणून त्या व्रतपुण्यफलानें मला आतां हें पूज्यत्व व ऐश्वर्य मिळाले आहे. तूंहि हें व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळ म्हणजे तुजाहि हें सर्व ऐश्वर्य अवश्य मिळेल. हें भाषण ऐकून कनकमंजरीस मोठा संतोष वाटला. मग तिनें त्या सरोवरांतील एक सहस्रदल कमळ
आणून शुचिर्भूत होऊन देवांस वाहिले. पुढे काळानुसार है शुक्रवार व्रतहि यथाविधि पाळिले. त्यायोगानें तिला गर्मोत्पत्ति होऊन नवमास पूर्ण झाल्यावर सनत्कुमार या नांवाचा एक महापराक्रमी पुत्र झाला. पुढे हा मोठ्या आनंदानें राज्योपभोग करूं लागला. ही कनकमंजरी आपल्या कालावसांनी समाधिपूर्वक मरण पावून व्रतपुण्यफलानें येथे ऐश्वर्यसंपन्न ज्वालामालिनी देवी झाली आहे. हे कथन ऐकून त्या प्रजापति महाराजांत मोठा आनंद झाला. मग पुनः ते महाराज • म्हणाले, – भो स्वामिन् ! पूर्वी हे व्रत आणखी कोणी पाळिलें आहे ? हे वाक्य ऐकून ते गणराज त्यांस म्हणतात. ऐका –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत काश्मीर नामक विस्तीर्ण देश असून त्यांमध्यें मधुरा नांत्राची एक सुंदर नगरी आहे. तेथे पूर्वी अरविंद नांवाचा अत्यंत गुणवान् व पराक्रमी असा राजा राज्य करीत असे. त्याला देवश्री नामें एक पट्टराणी होती. इच्यापासून त्याला अशनिवेग नामें एक पुत्र झाला होता. हा यौवनावस्थेत आला होता. यांच्यासह तो राजा सुखानें राज्योपभोग भोगीत असे.
एके दिवशीं प्रीतिंकर या नांवाचा एक दुसऱ्या देशाचा राजा तेथे गुप्तरीतीनें आला व भररात्रींच्या समयीं त्यानें गाढ निद्रेत असलेल्या त्या अशनिवेग राजपुत्रांस हळूच उचलून आपल्या रथांत नेऊन निजविलें. रथांत त्याला नीट आवळून बांधून आल्या मार्गाने मोठ्या वेगानें त्यानें रथ हाकिला. पुढें राजपुत्र जागा होऊन पाहतों तों त्याला असा भास झाला की, आपण रथांत बसून कोठें तरी चाललों आहे. मग त्यानें आपलें अंग आवेशानें एकदम फुगविलें. त्यासरशीं शरीराचीं बंधनें तटा- तट तुटीं. त्यानें तत्काळ रथांतून खालीं उडी टाकिली. तेव्हां प्रीतिंकरनें त्याला पुनः जबरीनें पकडून रथांत घालून अगदीं वेगानें रथ हाकून नेलें. आपल्या स्थानीं पोचल्यावर त्याला अतिशय संतोष झाला. कारण त्याला ९६ शाहण्णव सुंदर कुमारी होत्या. त्यांच्यांशी
अशनिवेगाचा आपल्या पूर्वनिश्वित प्रतिज्ञेप्रमाणे विवाह करावयाचा होता. असो. शुभमुहूर्तावर त्यानें आपल्या ९६ कन्यांशी त्याचा मोठ्या थाटानें विवाह केला. नंतर अनेक भूचर व खेचर राजे लोकांनी आपल्या कन्या त्याला विवाह करून दिल्या, अशा रीतीनें त्याला एकं- दर आठ हजार ८००० स्त्रिया झाल्या. या सर्व स्त्रियांसह तो मोठ्या आनंदांत साम्राज्यपदाचा उपभोग करूं लागला.
त्यासमयीं एकदां तो राजसमेत आनंदानें बसला असतां, – एक वनपालक येऊन उत्तम फलपुष्पें त्यांच्या समीप ठेवून त्यांस म्हणाला, – हे देव ! आज आपल्या पुण्योद्यानें येथील उद्यानवनांत एक महाज्ञानी- तपोधन मुनी येऊन उतरले आहेत. त्यांच्या माहात्म्यानें सर्व वन फलपु- प्पांच्या भारांनीं अत्यंत शोभायमान दिसत आहे. हे त्याचे भाषण ऐकून राजांस मोठा आनंद झाला. सिंहासनावरून उठून त्या दिशीं सात पाऊले चालत जाऊन त्यानें भक्तीनें साष्टांग परोक्ष नमस्कार केला. नंतर नगरांत आनंदमेरी देववून सकलजनांसह पादमार्गे वनांत गेला. तेथे मुनींना तीन प्रदक्षिणा देऊन भक्तीनें बंदना, पूजा करून त्यांच्या समीप जाऊन बसला. प्रेमानें व श्रद्धेनें तो धर्मोपदेश श्रवण करूं लागला. नंतर आपले दोन्ही हात जोडून तो मुनींद्रास म्हणाला- भो जगत्त्वामिन् ! आतां आम्हांस येथें इतकें जें साम्राज्य वैभव प्राप्त झालें आहे, ते कोणत्या कारणाने ? हा त्याचा प्रश्न ऐकून ते दिव्यज्ञानी तपोधन त्याला म्हणाले- हे राजन् ! तूं आपल्या पूर्वभवांत शुक्रवारत्रत यथास्थित पाळिलें होतें. त्या व्रत पुण्यप्रभावानें आतां तुला हे सर्व ऐश्वर्य प्राप्त झाले आहे, असे हे ऐक- तांच त्याला अतिशय आनंद झाला. त्यानंतर त्यानें हें शुक्रवारव्रत विधिपूर्वक त्यांच्याकडून जाणून घेऊन पुनः पाउन केले. या व्रतप्रभावानें त्याला आयुष्यांतीं स्वर्गसुख प्राप्त झालें आहे.
पुनः ते प्रजापति महाराज गणेंद्रास म्हणतात- भो दयाळु
स्वामिन् ! हे व्रत पुनः कोणी पाळिलें आहे काय? हा विनम्र प्रश्न ऐकून गणधर म्हणाले – हे राजन् ! या व्रताबद्दल तुम्हांस आणखी एक दृष्टांत सांगतो. ऐका –
या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत राजपुर नांवाचें सुंदर रमणीय पट्टण आहे. तेथे पूर्वी श्रीधर नांबाचा राजश्रेष्ठी राहात होता. त्याला श्रीधरी नाम्नी एक महापतिव्रता स्त्री होती. तिच्या पासून त्याला शिवगामिनी नामें कन्या जन्मली होती. ती जन्मल्यावर थोड्याच दिवसांत तिच्या दुर्दैवामुळे तिचे आई, बाप, बंधु बगैरे सर्व मरण पावले मग ती अनाथावस्येंत मोठ्या कष्टानें वांचली. पुढें एके दिवशीं आपल्या नगरांतून बाहेर पडून ती एका घोर कांतारांत गेली. तेथे इष्टवस्तु देणारे दहा प्रकारचे कल्पवृक्ष होते. एक मोठा निर्मळ पाण्यांनी तुडुंब भरलेला सरोवर होता. पण ही त्यांच्या कडे जवळ जाऊन पाहूं लागतांच तिच्या दुष्कर्मवशानें व दुर्दृष्टिपाताने ते सर्व कल्पवृक्ष अदृश्य झाले. सरोवर वाळून शुष्क झाला. अर्थात् सर्व जल आटून गेले. हे पाहून तिला अतिशय दुःख होऊन ती एकदम मूर्छित होऊन भूमीवर धाडकन् पडली. तेव्हां तेथेच तिला कांहीं गाढ निद्राहि लागली. त्या वेळीं तिला एक स्वप्न पडले. त्यांत अत्यंत ऐश्वर्य संपन्न सुंदर अशा कांहीं देवी येऊन तिच्या समोर उभ्या राहिल्या. त्यांना पाहून म्हणते- अहो देवीनो! तुम्हांस हैं जें ऐश्वर्य प्राप्त झाले आहे ते कसें ? मला साम्र निवेदन करावें. हे तिचे दीन वचन ऐकून त्यांतील एक मुख्यदेवी तिला म्हणते- या राजपुर पट्टणांत पूर्वी एक राजमंत्री राहात असे. त्याच्या आम्ही आठजन पुत्री होतो. आमचे जनक राजद्रोही झाल्यामुळे राजानें त्यांना ठार मारिलें. त्यावेळीं तेथे आमचे पालन पोषण करणारे कोणी नसल्याने आणि आमची अवहेलना होऊं लागल्यामुळे आम्ही तेथून या घोर अरण्यांत शिरलों तेथे वृक्षांची नानाविध पक्कफळे खाऊन जीवन करूं लागलो. अशा रीतीनें तेथेभ्रमत असतां आम्हांस एकदां बनदेवता अकस्मात् येऊन भेटल्या. त्यांनी आमची ही करुणास्पदस्थिती जाणून आम्हांस शुक्रवारव्रत विधान यथास्थित करावयास सांगितले. नंतर त्या तत्काळ अदृश्य झाल्या, मग आम्ही ते व्रत विधिपूर्वक पाळून त्याचे उद्यापन केलें. पुढें आम्हीं आयुष्यावसांनी मरण पावून या वनांतच अशा ऐश्वर्यसंपन्न देवी होऊन जन्मलो आहोत. हे सर्व कथन ऐकून तिला मोठें आश्वर्य वाटलें. मग ती शिवगामिनी कन्या पुनः त्या देवीस म्हणते- हे देवी ! आतां मी या वनांत प्रवेश करून पाहतांच सर्व कल्पवृक्ष एकदम अदृश्य झाले. सरोवरांतील जलहि एकदम आटलें. याचे कारण काय असावें ? हे तिचे प्रश्न ऐकून त्या देवी म्हणाल्या, – हे अभागिनी कन्ये ! तूं आपल्या पूर्वजन्मांत गर्वानें मत्त होऊन जिनेंद्र पूजेचा विध्वंस करून टाकिलेंस व व्रतधारकांचीं निंदा केळीस. त्यांच्या व्रताला प्रतिबंध केळीस; त्यांमुळे आतां तुझे आई बाप व बंधु वगैरे मरण पावले आहेत. तुझ्या कुदृष्टिपातानें येथील सगळे कल्पवृक्ष अदृश्य झाले. सरोवरांतील पाणी वाळून गेलें. याकरितां हे कन्ये ! आतां तुला पुढे जर सुखाची इच्छा असेल, तर हैं शुक्रवार व्रत कर. म्हणजे त्यायोगें तुला सर्व ऐश्वर्ये अवश्य मिळतील. हे तिचें वचन ऐकून तिनें हे व्रत जाणून घेऊन स्वीकारिलें. पुढें कालानुसार व्रत पाळून उद्यापन केलें. नंतर ती शिवगामिनी आयुष्यांतीं मरण पावून व्रतपुण्य- फलानें भूतराय नामक बनांत महा ऐश्वर्यसंपन्न अशी यक्षी होऊन जन्मली. असा या व्रताचा दृष्टांत ऐकून प्रजापति महाराजांस मोठा संतोष वाटला, मग ते गणेंद्रास शेवटी म्हणतात, हे गणाधीश ! आतां आपण आम्हांस या व्रताचा काल व विधी वगैरे सांगावें. तेव्हां गणराज म्हणतात, हे भव्यशिरोमणि राजन् ! आतां तुला या व्रताचा सर्वविधि सांगतो. ऐक. असें म्हणून त्यांनी त्यांत समग्रविधि सांगि- तळा. ते ऐकून सर्वांस मोठा आनंद झाला. नंतर श्रीगणधरांस राजा-
राणीनें प्रार्थना करून त्यांच्या कडून हें व्रत स्वीकारिलें. मग वृषभनाथ जिनेश्वरांस व सर्व मुनीश्वरांस ते सर्वहि लोक भक्तीनें नमस्कार करून आपल्या नगरी परत आले. पुढें कालानुसार है व्रत विधिपूर्वक पाळून त्याचें उद्यापन केलें. या व्रतपुण्यफळाच्या योगानें ते अनेक ऐश्वर्य संपन्न होऊन क्रमानें अनंत शाश्वतसुख प्राप्त करून घेतलें.